Sunday, 18 March 2018

पूर्वरंग

५ वी मध्ये असताना कोकणात आत्या च्या गावी म्हणजेच सावंतवाडी ला जून-जुलै मध्ये जाण्याचा पहिला योग आला आणि अतिशय उत्साहाने आम्ही प्रवासाला निघालो, प्रवास होता केज(मराठवाडा) ते सावंतवाडी(कोकण) तब्बल ४६० किलोमीटर, पावसाळा असल्या कारणाने हवेत गारवा होता आणि आकाश काळ्या ढगांनी व्यापलेले होते,मी,आई-बाबा,दिदी-पल्लवी(मोठी आणि लहान बहीण),आजी-आजोबा अशे अक्खे कुटुंब होतो आम्ही,आई-आजीने पहाटे उठून बनवलेले मस्त धपाटे आणि शेंगदाण्याची चटणी आणि घरच्या शेतातल्या कैरीचे छान मुरलेले लोणचे असा सगळं सोबत घेऊन प्रवास घडत होता.
धपाटे खाऊन जठराग्नी शांत झाल्यावर दुपारी 2 च्या सुमारास आंबोली गावात पोहचलो,बाबानी या आधी बरयाचदा सावंतवाडी वारी केली असल्या कारणाने मला कल्पना दिली कि हर्षल आता आंबोलीचा घाट सुरु होतोय तुला हि जागा आवडेल😊.मी आंबोली घाट प्रारंभ अशी पाटी वाचली आणि पुढच्या १८ किलोमीटर च्या स्वर्गसुखासाठी तयार होऊन बसलो.अश्या वेळी आजूबाजूला पाहून संत तुकारामांच्या खालील ओळी मनात आल्या नाही तर नवलच
"वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
  पक्षी ही सुस्वरें आळविती ।।"
पुस्तकातला सहयाद्री चक्क डोळ्यांसमोर होता आणि तो पण हिरवा शालू पांघरलेला त्याच्या सर्वांग सुंदर रूपात.पहिल्या नजरेत प्रेम होत म्हणतात ना ते इथे झाला आणि मी अंबोलीच्या प्रेमात पडलो.
अगदी थोडक्यात वर्णन करायचा झालाच तर आंबोली म्हणजे माझ्या मते भारताचा अमेझॉन आहे,आणि मला असा का वाटतं हे मी सविस्तर नंतर सांगेलच. प्रथमदर्शनी दिसणार आंबोली म्हणजे दोन्ही बाजूला धुक्यात हरवलेली गर्द झाडी, त्या गर्द झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज, ऊन पावसाचा लपंडाव,उंचावरून कोसळणारे धबधबे,एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आणि त्यात तो वळणावळणाचा रस्ता (याचा नवल वाटायचं कारण आमच्याकडे असा रस्ता बघायला मिळणं दुर्मिळ),असा १८ किलोमीटर चा शुद्ध ऑक्सिजन फुफुसात भरून शेवटी सावंतवाडी ला पोहचलो,पण मी मात्र अजून आंबोलीतच होतो.
आधीच निसर्गाबद्दल कुतुहूल असल्याने आणि आता आंबोलीतील निसर्ग प्रत्यक्ष पाहिल्याने माझ्या मनात  असंख्य प्रश्न निर्माण झालेले, आणि परत मला तुकारामांच्या ओळी आठवल्या
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।
मनातील प्रश्न तूर्तास बाजूला ठेऊन मी परत सावंतवाडीत आलो 😉,नेहमीच मोठ्या मानाने आणि मनाने सर्वांचे स्वागत करणारे आमचे धीरु मामा आणि माई आत्या आतुरतेने वाट पाहत होतेच.प्रवास कसा झाला या वाक्याने सुरवात झाल्यावर,आब्जांचे (म्हणजे माझ्या आजोबांचे) एका ठरलेले वाक्य होते जे ते गोरक्षनाथांच्या गोष्टी सांगताना वापरायचे जे मला आठवते आणि ते म्हणजे "मजल दर मजल करत", आणि आमचा प्रवास पण तसाच झाला.गप्पा झाल्यावर रात्रीचे जेवण आटोपून थकून गेलेलो आम्ही केंव्हा झोपी गेलो कळलं देखील नाही.
दुसऱ्या दिवशी एका देवस्थानी जायचा आधीच ठरलेला असल्याने मी जास्त उत्साही नव्हतो (कारण मी सुरवातीला निसर्ग ह्या एकाच देवाला मानायचो) नंतर जशी जशी अक्कल वाढत गेली तशे अनुभव आणि देव पण वाढले,पण अजून देखील सर्वश्रेष्ठ निसर्गच.आम्ही त्या जागेवर पोहचलो त्या जागेचा नाव मला आता आठवत नाही पण ती जागा अतिशय निसर्गरम्य होती आणि मंदिराच्या मागच्या बाजूस खूप उंच उंच झाड होती आणि तिकडून एक विचित्र अनोळखी आवाज सतत कानी पडत होता,हि मंडळी मंदिरात गेली असताना मी मात्र कुतुहुलापोटी आवाजाचा मागोवा घेत त्या झाडांकडे गेलो,आणि वरती पाहतोय तर काय त्या उंच झाडावर एका ढोलीत चोच आत टाकून काहीतरी भरवत असलेला एक अत्यंत सुंदर आणि भव्य पक्षी,ज्याची चोच अतिशय मोठी,चोचीचा रंग पिवळा,पंख काळे आणि त्याला पांढरा आणि पिवळया रंगाचे पट्टे आणि शेपूट पांढरी आणि त्यातला काही भाग काळा असा मला दिसला, त्याला पाहून मी स्थब्ध राहिलो आणि निरीक्षण करत बसलो.हाच तो क्षण जेंव्हा मी ठरवलं याचा शोध लावायचा आणि पूर्ण माहिती काढायची.आणि तेवढ्यात ओळखीचा आवाज कानी पडला तो म्हणजे "हर्षल इकडे ये " आणि मी तिकडून इच्छा नसताना देखील काढता पाय घेतला.आणि मंदिरात आल्यावर मी बाबांना आणि धीरु मामांना मी पाहिलेल्या पक्ष्याबद्दल सांगितलं आणि मला त्या पक्ष्याचा नाव धनेश असा सांगण्यात आले.ते क्षण सतत डोळ्यांसमोर येत होते आणि तेच मनात ठेऊन आम्ही बाकी ठिकाणी भटकून वापस सावंतवाडी ला परतलो.

             दिवस ३ रा - आंबोली दर्शन   

4 comments: